घरच्याघरी कुरकुरीत व्हेजिटेबल कटलेट असे बनवा | Crispy Vegetable Cutlet Recipe in Marathi
व्हेजिटेबल कटलेट (Vegetable Cutlet) म्हणजे सर्वांचे आवडते स्नॅक्स, जे आपण ब्रेकफास्टला किंवा संध्यकाळाच्या न्याहारीला पण बनवु शकतो. बच्चे कंपनीमध्ये तर व्हेजिटेबल कटलेट हे फार फेमस आहे. त्यातल्या त्यात मुलांना व्हेजिटेबल्स खाऊ घालणें हे फार कठीण असतं, अशा मध्ये जर आपण कटलेट स्वरूपात त्यांना वेगवेगळ्या भाज्या खाऊ घातल्या तर त्यांना काही नवीन खाण्याचा आनंदही मिळतो आणि पालकांना मुलांनी भाज्या खाल्याचे सुखही मिळते. चला तर मग, आता आपण बनवूया व्हेजिटेबल कटलेट!
व्हेजिटेबल कटलेट (Vegetable Cutlet) – साहित्य
- २ लहान गाजर
- २ माध्यम आकाराचे कांदे
- ४ ते ५ उकडलेले बटाटे
- ७ ते ८ बिन्स (फरसबी)
- १२५ ग्रॅम फुलकोबी
- १ शिमला मिरची
- १/४ वाटी हिरवे मटार
- १/४ वाटी कॉर्न दाणे
- ४ ते ५ हिरव्या मिरच्या
- १ चमचा अद्रक-लसुण पेस्ट
- ४ ते ५ चमचे कॉर्न फ्लोअर
- ५ चमचे मैदा
- १० ते १२ ब्राउन टोस्ट
- १/२ चमचा काश्मिरी लाल तिखट
- १/२ चमचा जिरे पुड
- १/२ चमचा किचन किंग मसाला
- १/४ चमचा चाट मसाला
- १/२ वाटी भिजवलेले पोहे
- १ लिंबाचा रस
- चवीप्रमाणे मिठ
- तळण्यासाठी तेल
कृती
व्हेजिटेबल कटलेट ची रेसिपी आपण तीन भागांमध्ये विभाजित करून घेऊया. तर पहिल्या भागामध्ये आपल्याला जे व्हेजिटेबल्स आहेत त्यांचे बारीक असे काप करायचे आहेत. दुसऱ्या भागामध्ये आपल्याला जे कटलेट आहे ते बनवून घ्यायचे आहेत आणि तिसऱ्या भागांमध्ये आपल्याला कटलेट तळायचे आहेत. तर तळण्यासाठी जी तय्यारी लागेल ती तर सर्वप्रथम आपण आता पाहून घेऊ. तर कटलेट कव्हरिंग साठी आपल्याला ब्राउन टोस्ट चा भुरका लागणार आहे. त्या करता सर्वप्रथम ब्राउन टोस्ट चे हाताने छोटे तुकडे करून ते तुम्ही मिक्सर मध्ये हलकेसे फिरवून घेऊ शकता, किंवा हातानेच ब्राउन टोस्ट चा भुरका करून घेऊ शकता. लक्षात असू द्या, आपल्याला टोस्ट चा भुरका करायचा आहे, पावडर किंवा पुड नाही.
या सोबतच कव्हरिंग चा दुसरा भाग म्हणजे मैदा आणि कॉर्न फ्लोअर चे घट्ट-पातळ असे मिश्रण. त्याकरता एका मोठ्या भांड्या मध्ये २ चमचे कॉर्न फ्लोअर आणि ३ चमचे मैदा घ्या. त्यात चिमुटभर मिठ घालुन पाण्याने बासुंदी सारखे मिश्रण करून घ्या. हे मिश्रण अगदी एकजीव झाले पाहिजे, मैदा किंवा कॉर्न फ्लोअर च्या गाठी राहता काम नये. आणि आता कव्हरिंग चा तिसरा आणि शेवटचा भाग म्हणजे कोरडा मैदा. एका थाळी मध्ये ४ ते ५ चमचे कोरडा मैदा काढून घ्या.
आता आपण मुख्य कृतीच्या पहिल्या भागाकडे वाळू. त्यासाठी गाजर, शिमला मिरची, फुलकोबी, बीन्स (फरसबी), हिरव्या मिरच्या आणि कांदे हे आपल्याला एकदम बारीक कापायचे आहेत. तुम्ही ते चाकूने कापू शकता किंवा तुम्ही चॉपर चा वापर सुद्धा करू शकता. सर्व भाज्या आपण पहिले शिजवून घेत नाही आहोत, या भाज्या आपण सगळ्या कच्च्याच वापरणार आहोत त्याच्यामुळे त्या जेवढ्या बारीक कापल्या तेवढ्या लवकर आणि छान सारणासोबत शिजतील. त्यामुळेच जितके बारीक कापता येईल तितके चांगले (खालील फोटोमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे). जर तुम्ही फ्रोजन कॉर्न आणि मटर वापरत असाल, तर कमीत कमी दहा ते बारा मिनिटांसाठी तुम्हाला ते नॉर्मल पाण्यामध्ये भिजू ठेवून द्यावे लागेल. त्याने त्याचा थंडपणा तेवढा निघून जाईल आणि ते नॉर्मल तापमानावर वर येतील. गरज वाटल्यास कॉर्न दाणे हलकेसे उकडून घेऊ शकता.
आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. उकडलेले बटाटे, हिरवे मटार, कॉर्न दाणे, गाजर, बीन्स, शिमला मिरची, फुलकोबी, कांदे आणि हिरव्या मिरच्या हे जे बारीक कापलेले आपले व्हेजिटेबल्स आहेत ते सगळे आपल्याला एकत्र करायचे आहेत. उकडलेला बटाटा आपण हाताने कुचकरून घेऊ शकतो किंवा तो तुम्ही मोठ्या किसने किसून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा हाताला जास्ती त्रास होणार नाही. आता या सर्व भाज्यांमध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. यामध्ये तुम्हाला भिजवलेले पोहे, अद्रक लसणाची पेस्ट, लाल तिखट, जिरे पुड, गरम मसाला, चाट मसाला, किचन किंग मसाला, लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायच आहे.
यामध्ये साखर टाकण्याची गरज नाही कारण आपण यामध्ये गाजर आणि कॉर्न टाकतो आहोत. लाल तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. जर कटलेट तुम्हाला थोडे जास्त चमचमीत हवे असतील तर तुम्ही थोडं तिखट किंवा हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा वाढवू शकता. आता हे सगळं मिश्रण आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, त्यासोबतच यामध्ये दोन चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकायचा आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला आता एकत्र करून याचे आवडीप्रमाणे लहान/मोठे गोळे बनवून घ्यायचे आहेत. लक्षात असू द्या, यात आपल्याला पाणी बिलकुल टाकायचे नाहीये, भाज्यांची जी नैसर्गिक आर्द्रता आहे तीच आपल्याला यासाठी वापरायचे आहे. तुम्हाला जर गोल कटलेट आवडत असतील तर तुम्ही गोलाकार कटलेट करू शकता किंवा तुम्हाला जर रोल सारखे कटलेट आवडत असतील तर तुम्ही तसे पण बनवू शकता.
Also Read
चमचमीत व्हेज हंडी अशी बनवा | Veg Handi Recipe in Marathi
तर आता आपण तिसऱ्या भागाकडे वळूया. तर तिसऱ्या भागांमध्ये आपल्याला आता कटलेट हे तळण्यासाठी तय्यार करायचे आहेत, व नंतर तळून घ्यायचे आहेत. कटलेट कव्हरिंग साठी जे आपण ३ भाग तय्यार केले होते ते आता आपल्याला लागणार आहेत. आपण जे गोळे तयार करून घेतले होते, त्यातील एक गोळा घेऊन त्याला पूर्णपणे कोरड्या मैद्याने कव्हर करा (खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे). पूर्ण मैद्याने कव्हर झाल्यावर हलक्या हाताने त्यावर जो अतिरिक्त मैदा तो आहे तो काढून टाका. आता दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला त्याला मैदा आणि कॉर्न फ्लोअर सारणाचे कोटिंग करायचं आहे. त्यासाठी आपण जे मैदा-कॉर्न फ्लोअर चे सारण तयार केले आहे त्यामध्ये कटलेट चे गोळे टाकून त्याला पूर्णपणे कव्हर करून घ्या. आता हे कव्हर केलेले कटलेटचे गोळे आपल्याला ब्राउन टोस्ट च्या भुरक्या मध्ये कव्हर करून घ्यायचे आहे. अतिरिक्त भुरका तुम्ही थोडा हलक्या हाताने काढून घेऊ शकता. असेच आपल्याला आता सर्व कटलेट चे जे गोळे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत.
व्हेजिटेबल कटलेटचे हे तय्यार गोळे तुम्ही असेच जर डीप फ्रीजर मध्ये टाकून ठेवले तर ते दोन ते तीन दिवसापर्यंत चांगले राहतात. आता आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढईत तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला एका वेळेला तीन ते पाच असे कटलेट टाकून तळुन घ्या. पण लक्ष असू द्या कि खूप सारे कटलेट एकत्र टाकून कढईमध्ये गर्दी करू नका, अन्यथा कटलेट तुटू शकतात.
मिडीयम आचेवर हे कटलेट गोल्डन ब्राउन होई पर्यंत तळून घ्या. तळलेले कटलेट एक थाळी मध्ये टिशु पेपर वर काढून घ्या. आपले व्हेजिटेबल कटलेट हे तय्यार आहेत.
तुम्हाला हि रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कंमेंट सेकशन द्वारे जरूर कळवा.