शेंगदाण्याची चटणी । इडली डोसा उत्तपम आप्पे चटणी । Shengdana Chutney Recipe in Marathi
शेंगदाण्याची चटणी (Shengdana Chutney) इडली/डोसा/उत्तपम/आप्पे सोबत खायला फार चांगली लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे. म्हणूनच उडुपी अण्णा नेहमी रेगुलर चटणी सोबत शेंगदाणा चटणी पण आवर्जुन सर्व्ह करतो. चला तर आज बनवूया आपण शेंगदाण्याची चटणी.
शेंगदाण्याची चटणी (Shengdana Chutney) – साहित्य
- १ वाटी शेंगदाणे
- ४ ते ५ हिरव्या मिरच्या
- ३ ते ४ लसूण पाकळ्या
- १/२ इंच अद्रक तुकडा
- १/२ चमचे जिरे
- १ लिंबाचा रस
- १/३ चमचे साखर
- चवीप्रमाणे मिठ
- कडीपत्ता
- १/४ चमचे मोहरी
- २ लाल मिरच्या (Optional)
- २ ते ३ चमचे तेल
कृती
सर्वप्रथम शेंगदाण्याची चटणी तयार करण्यासाठी आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यावे लागतील. तर त्याकरता गॅसवर कढई ठेवून त्यात मध्यम आचेवर शेंगदाणे भाजून घ्या. भाजताना लक्षात असू द्या की आपल्याला सातत्त्याने चमचा शेंगदाण्यांमध्ये हलवावा लागेल, अन्यथा शेंगदाणे लागण्याची शक्यता असते. शेंगदाणे खमंग भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि थंड होऊ द्या. शेंगदाणे थोडे थंड झाले की आपल्याला त्याचे वरचे साल काढून टाकायचे आहे. तर त्याकरता शेंगदाणे हातात घेऊन दोन्ही हातामध्ये थोडेसे मळून हलक्या हाताने साल काढून घ्या.
आता आपण चटणी करायला घेऊ. त्याकरता हिरवी मिरची, अद्रक आणि लसण यांचे सुरीने अगदी बारीक काप करा, म्हणजे मिक्सर मध्ये सहज मिश्रण बारीक होईल. मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसणाचे तुकडे, अद्रकाचे तुकडे, मिठ, साखर आणि जिरे टाकून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या. मिश्रणामध्ये थोडं पाणी आणि लिंबाचा रस टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या आणि एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घ्या. याची कन्सिस्टंसी तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे ठेऊ शकता. साधारणतः हि चटणी थोडी पातळ असते. आपली शेंगदाण्याची चटणी पेस्ट तयार आहे.
Also Read,
कुरकुरीत ब्रेड चीज बॉल्स असे बनवा | Bread Cheese Balls Recipe in Marathi
आता आपण तडक्याची तयारी करू. तर त्यासाठी आपल्याला एक तडका पॅन घ्यायचे आहे. त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यामध्ये हिंग, बारीक मोहरी, कडीपत्ता आणि दोन लाल मिरच्या टाकून तडतडून घ्या. तयार तडका चटणी मध्ये एकत्र करून घ्या. आपली शेंगदाण्याची चटणी तय्यार आहे. अशी हि शेंगदाण्याची चटणी इडली, डोसा, उत्तपम, किंवा आप्पे यासोबत छान लागते. हि चटणी साधारणतः ४ ते ५ दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास चांगली राहते.
तुम्हाला हि रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कंमेंट सेकशन द्वारे जरूर कळवा.