सर्वांचा आवडता आलू पराठा अगदी सोप्या पद्धतीने | Aalu Paratha Recipe in Marathi
लहान मुलं असो की मोठी माणसं आलू पराठा (Aalu Paratha) आवडणार नाही असा एखादा माणूस शोधूनही भेटणे कठीण आहे. आलू पराठा म्हणजे केव्हाही, कुठेही खाऊ शकतो असा पदार्थ. बनवायला अगदी सोपा आणि खायला तर अगदी चमचमीत. चला तर बनवूया आलू पराठा.
आलू पराठा (Aalu Paratha) – साहित्य
- उकडलेले आलू/बटाटे – २५० gm
- बारीक चिरलेला कांदा – १
- बारीक चिरलेली हिरवी मिरची – ३ ते ४
- आमचुर पावडर – १/२ चमचा
- तिखट – १ चमचा
- हळद – १/२ चमचा
- धने पुड – १/२ चमचा
- जिरे – १/४ चमचा
- मोहरी – १/४ चमचा
- धने व सोप (जाडसर पुड) – २ चमचे
- कोथिंबीर
- अद्रक लसूण चे वाटण – १ चमचा
- साखर – चवीनुसार
- मिठ – चवीनुसार
- तेल – ३ ते ४ चमचे
- मळलेली कणिक (पराठ्या साठी)
- बटर
कृती
आलू पराठा (Aalu Paratha) बनवण्यासाठी आपल्याला मुख्यतः दोन गोष्टींची तय्यारी करावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे बटाट्याचे सारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे गव्हाच्या पिठाची मळलेली कणिक. तर सर्वप्रथम आपण बटाट्याचे सारण बनवून घेऊया.
बटाट्याचे सारण बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावे. सर्वात सोपी पद्धत म्हणजे प्रेशर कुकर मध्ये बटाटे टाकून २ शिट्ट्या काढल्या कि उकडलेले बटाटे तय्यार. उकडलेल्या बटाट्यांचे साल काढून बटाटे थोडे थंड करून घ्या. बटाटे थंड झाले की हाताने त्यांचे बारीक तुकडे करून घ्या. जर बटाटा खूप कडक असेल तर अजून थोडा उकळावा लागेल किंवा तुम्ही सर्वप्रथम चाकूने सुद्धा त्याचे छोटे तुकडे करून मग हाताने त्याला हलकसं मॅश करू शकता.
आता कढईमध्ये थोडं तेल गरम करा. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग टाकून परतवून घ्या. आता यामध्ये बारीक हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि अद्रक लसूण चे वाटण टाकून पुन्हा परतून घ्या. कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचे आहे. कांदा लालसर झाला की त्यामध्ये थोडी हळद, तिखट, धने पुड व सोप पुड घालून पुन्हा सारण परतवून घ्या.
कांदा शिजला की आता या सारणामध्ये उकडलेल्या बटाट्यांचे मिश्रण घालून पूर्ण मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या. या मिश्रणात चवीप्रमाणे थोडे मीठ व काही साखरेचे दाणे टाका आणि सर्व मिश्रण एकत्र पुन्हा परतवून घ्या. या क्षणाला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रणाला हलके हलके परतवत राहायचे आहे. आता परतवलेले सारण एका पसरट भांड्यामध्ये थंड करायला काढून घ्या.
Also Read
विदर्भ स्पेशल तुरीच्या दाण्यांची आमटी | Turichya Danyachi Aamati Recipe in Marathi
आता आपण पराठे बनवण्यासाठी कणिक मळून घेऊ. हि कणिक आपण नॉर्मल चपात्या बनवतो तशीच मळायचे आहे त्यामुळे यात काही नवीन नाही. कणिक मळून झाली की त्या कणकेचे मध्यम आकाराचे असे गोळे बनवून घ्या.
बटाट्याचे सारण थंड झाल्यावर त्याचे हाताने लहान लहान गोळे तयार करून घ्या. प्रत्येक गोळा हा आपण एक पराठा बनवण्यासाठी वापरणार आहोत. तर तुम्हाला ज्या पद्धतीने पराठा आवडत असेल त्या प्रमाणे तुम्ही त्या आकाराचे गोळे करून घ्या. जर तुम्हाला भरपूर बटाटे सारण भरलेला पराठा आवडत असेल तर थोडे मोठे गोळे बनवा आणि जर तुम्हाला कुरकुरीत असा पतला पराठा आवडत असेल तर थोडे छोट्या आकाराचे गोळे करून घ्या.
आता आपलं बटाट्याच्या सारण आणि मळलेली कणकेचे गोळे हे दोन्ही तयार आहेत. तर आता आपण आपल्या मुख्य कृतीकडे वळूया. बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी कणकेचे गोळे घेऊन त्याचा पुरीसारखा एक छोटा आकार बनवून घ्या. आता यात बटाट्याच्या सारणाचा गोळा भरून मोदकासारखा बंद करून घ्या, आणि त्याला हाताने हलके हलके दाबून त्याचा एक छोटा गोळा बनवून घ्या. आता या गोळ्याचे आपण नॉर्मली जसे पराठे करतो त्याप्रमाणे पराठे लाटून घ्या.
हे पराठे लाटताना लक्ष द्या की सारण फुटून बाहेर येणार नाही त्यामुळे कमीत कमी दाबात आपल्याला हे पराठे लाटायचे आहे. पराठा लाटून झाला कि एका गॅसवर तवा गरम करून घ्या, ताव गरम झाली कि त्यावर बटर लावून घ्या आणि हा पराठा बटरमध्ये खुसखुशीत भाजून घ्या. बटर हे ऑप्शनल आहे पण शक्यतो थोडं तेल तरी वापरावे लागेल. दोन्ही बाजूंनी पराठा बटर लावून खुसखुशीत भाजून घेणे गरजेचे आहे. पराठा छान कुरकुरीत ब्राउन झाला कि आपला आलुचा पराठा (Aalu Paratha) तय्यार.
पराठा (Aalu Paratha) सर्व्ह करताना त्यावर बटर चा एक तुकडा टाकून, सोबत दही आणि आंबा मिरची चे लोणचे ठेवावे.