सर्वांचे आवडते कांदे पोहे | Kande Pohe Recipe in Marathi
कांदे पोहे (Kande Pohe) म्हणजे अख्या महाराष्ट्राची सर्वात आवडती न्याहारी. न्याहारी मध्ये पोहे असले तर कोणीच न्याहारीला नाही म्हणणार नाही. आणि सोबत जर गरमागरम चहाचा कप असला तर बातच काही निराळी! मग वेळ कशाला घालवायचा, चला तर बनवूया मस्त असे कांदे पोहे.
साहित्य
- साफ जाडे पोहे – २५० gm
- हिरवी मिरची – ३ ते ४
- कांदे – २
- बटाटे – १
- कढीपत्ता – ६ ते ७ पान
- लिंबू
- हळद
- जिरे
- हिंग
- साखर
- मिठ
- तेल – ३ ते ४ चमचे
- खोबरं किस
कृती
सर्वप्रथम आपल्याला झाडे पोहे घेऊन ते पाण्याने भिजवून घ्यायचे आहे. यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे एका चाळणीत पोहे घेऊन त्यावर हलकं पाणी सोडून पोहे भिजवून घ्या. अशा पद्धतीने पोहे भिजल्यावर पोहे खूप गिलगिल असे अती भिजणार पण नाहीत आणि अतिरिक्त पाणी जे आहे ते पण निघून जाईल.
प्रथम पोहे चाळणीत टाकून हलक्या पाण्याने भिजवून घ्या आणि बाजूला ठेऊन द्या.
आता आपल्याला बाकी साहित्याची तयारी करायची आहे. तर त्यासाठी एक माध्यम आकाराचा कांदा घेऊन त्याचे बारीक पण लांब असे काप करून घ्या. तसेच तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचे बारीक किंवा हलके मध्यम आकाराचे काम करून घ्या. बटाटा आपल्याला कच्चा घ्यायचा आहे. कच्चा बटाटा सोलून म्हणजेच त्याचे साल काढून त्याचे बारीक किंवा मध्यम तुमच्या आवडीप्रमाणे असे छान तुकडे करून घ्या. लक्षात असू द्या तुकडे केलेले बटाटे आपल्याला पाण्यात टाकून ठेवावे लागेल नाहीतर त्याचा रंग बदलतो.
आता आपण मुख्य पाककृतीकडे वळूया. गॅसवर एक कढई ठेवून त्यात दोन ते तीन चमचे तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यामध्ये थोडे जिरे, मोहरी, हिंग आणि हिरवी मिरची टाकून परतवून घ्या. आता त्यामध्ये कापलेले कांदे आणि बटाटे घालून परतवून घ्या. आपण कांदे आणि बटाटे सोबतच टाकतो आहे कारण आपल्याला कांदे आणि बटाटे दोन्हीही २/३ शिजवून घ्यायचे आहे. उरलेले १/३ कांदे आणि बटाटे हे पोह्यांसोबत शिजून जातील.
Also Read
झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा | Hiravya Mirchicha Thecha Recipe in Marathi
हे कांदे आणि बटाटे मिश्रण आपल्याला एक ते दोन मिनिटे पर्यंत परतून घ्यायचे आहे. मधून मधून चमच्याने बटाट्याला थोडं दाबून पहा, बटाटा जर हलक्या दाबाने तुटत असेल तर बटाटा २/३ शिजलेला आहे असे समजावे. आता भिजलेले पोहे एका भांड्यामध्ये काढून घ्या, त्यावर हलकी हळद, थोडी साखर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून ते हलक्या हाताने कालवून घ्या. आता हे कालवलेले पोहे आपल्या कांदे बटाट्याच्या मिश्रणामध्ये कढईत टाकून एकत्र मिसळून घ्या.
आपल्याला आता या पोह्यांना एक छान वाफ काढून घ्यायची आहे. गॅस मंद आचेवर करून पोह्यांवर झाकण ठेवून एक ते दीड मिनिट पोहे वाफ येऊ द्या. एक ते दोन मिनिटानंतर झाकण काढून पोहे पुन्हा चमच्याने हलक्या हाताने एकत्र करून घ्या. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि पोह्यांवर (जर आवडत असेल तर) ताजे किसलेले खोबरे आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या. आपले गरमागरम पोहे तयार आहेत.
पोहे सर्व्ह करताना सुद्धा आपण पोह्यांवर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबऱ्याचा कीस टाकून सोबत एक लिंबाची फोड ठेवून देऊ शकतो. तर कसे वाटले कांदे पोहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मधून जरूर कळवा.