विदर्भ स्पेशल तुरीच्या दाण्यांची आमटी | Turichya Danyachi Aamati Recipe in Marathi
पौष्टिक तुरीच्या दाण्याची आमटी (Turichya Danyachi Aamati) विदर्भाची विशेषता आहे, हिवाळा आला कि घरो घरी हि आमटी बनलीच पाहिजे. मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरी सोबत तुरीच्या दाण्याची आमटी खाण्याची मजाच काही और असते. चला तर बनवुया तुरीच्या दाण्याची पौष्टिक आमटी.
तुरीच्या दाण्याची आमटी (Turichya Danyachi Aamati) – साहित्य
- १ वाटी तुरीचे दाणे
- ७ ते ८ लसूण पाकळ्या
- १/२ इंच आले
- ३ ते ४ हिरव्या मिरच्या
- १ कांदा
- २ टमाटर
- धने पुड – १ चमचा
- गरम मसाला – १ चमचा
- तिखट – १.५ चमचा
- हळद – १/२ चमचा
- जिरे – १/२ चमचा
- मोहरी – १/२ चमचा
- हिंग
- मिठ – चवीनुसार
- तेल – ३ ते ४ चमचे
कृती
तुरीच्या दाण्याची आमटी बनवण्या साठी सर्व प्रथम तुरीचे दाणे साफ करून, एक ते २ पाण्याने धुवून घ्या. घुवून साफ केलेले तुरीचे दाणे साफ कोरड्या कापडावर १५ ते २० मिनिटे पसरवून घ्या, जेणेकरून अतिरिक्त पाणी निघून जाईल. आता या दाण्यांचे आपल्याला जाडसर वाटण करायचे आहे. त्या करता मिक्सर मध्ये तुरीचे दाणे टाकून बिना पाण्याने जाडसर फिरवून घ्या, अथवा सगळ्यात उत्तम म्हणजे पाटा वरवंट्यावर तुरीचे दाणे छान जाडसर वाटून घ्या.
आता आपल्याला अद्रक, लसूण आणि मिरचीचे वाटण करून घायचे आहे. त्या करता मिक्सर मध्ये अद्रक, लसूण आणि मिरची चे तुकडे टाकून बारीक वाटण करून घ्या. जमेल तर पाणी न टाकता हे वाटण करा, पण जर जास्तच कोरडे वाटण होत असेल किंवा बारीक वाटण होत नसेल तर थोडं पाणी घाला. सोबत टमाटर आणि कांदे सुद्धा बारीक कापून घ्या. इथे टमाटर आणि कांदे बारीक कापायचे आहे, त्यांचे वाटण करायचे नाही.
Also Read
आरोग्यवर्धक शेपूची भाजी अशी बनवा | Shepuchi Bhaji Recipe in Marathi
आता सुरु करूया मुख्य पाककृती. गॅस वर ३ ते ४ चमचे तेल गरम करून घ्या. तेल गरम झाले कि त्यात जिरे, मोहरी, हिंग परतून त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा छान गुलाबीसर होई पर्यंत परतवुन घ्या. कांदा गुलाबीसर झाला कि त्यात अद्रक, लसूण आणि मिरची चे वाटण घाला. मंद आचेवर १ मिनिटे पर्यंत हे वाटण परतवून घ्या. नंतर बारीक चिरलेला टमाटर, धने पुड, हळद, मिठ घालून टमाटर मसाल्या मध्ये छान शिजवून घ्या. याला सर्वसाधारणपणे २ ते ३ मिनिटे लागू शकतात. सोबतच दुसऱ्या गॅसवर एक पातेल्यामधे २ ते ४ कप पाणी गरम करायला ठेवा.
मसाल्याला कडेवर चॅन तेल सुटले कि मसाला शिजला असे समजावे. आता यात वाटलेले तुरीचे दाणे घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या आणि नंतर मंद आचेवर ५ ते ८ मिनिटे वाफ काढून घ्या. मध्ये मध्ये चमचा हलवत राहा म्हणजे मसाला करपणार नाही. मिश्रणाला छान वाफ निघाली की आता त्यात साधारणपणे २ कप गरम पाणी घाला आणि चमच्याने मिसळुन घ्या. सारणाला उकळी आली कि त्यात वरून गरम मसाला, चवीपुरती काही दाणे साखर आणि कोथिंबीर टाकून एक उकळी काढून घ्या. आमटी जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी घालू शकता.
सारणाला छान उकळी आली कि आपली तुरीच्या दाण्याची आमटी तय्यार. मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरी सोबत तुरीच्या दाण्याची आमटी खाण्याची मजाच काही और असते. तुम्ही तुमच्या आवडी नुसार बाजरीची भाकर किंवा सध्या चपाती सोबत सुद्धा तुरीच्या दाण्याची आमटी खाऊ शकता.
तर कशी वाटली हि रेसिपी हे आम्हाला कंमेंट सेकशन मध्ये जरूर कळवा.