घरच्याघरी चमचमीत पनीर बटर मसाला असा बनवा – Paneer Butter Masala Recipe in Marathi
बटर पनीर मसाला म्हणजे सर्वांच्या आवडीचा एक क्रीमी आणि मसालेदार पदार्थ. रेस्टॉरंटसारखी चव घरीच मिळाली की मजाच वेगळी! मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पनीर आवडते आणि जेव्हा ते बटर आणि मसाल्यात मुरते तेव्हा चव आणखी दुप्पट होते. आज आपण बाजारात मिळणारा पनीर बटर मसाला वापरून खूपच सोपी आणि झटपट रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग, सुरू करूया!
बटर पनीर मसाला – साहित्य
- २५० ग्रॅम पनीर
- १०० ग्रॅम बटर पनीर मसाला (रेडी मसाला)
- २ मध्यम आकाराचे टोमॅटो
- १ मध्यम आकाराचा कांदा
- ३-४ चमचे मगजबी (खरबूज बिज)
- ३-४ लसणाच्या पाकळ्या
- १ इंच आल्याचा तुकडा
- २ ते ३ चमचे लाल तिखट (तुमच्या आवडीप्रमाणे)
- १ चमचा जिरे
- १ चमचा धणे पूड
- २-३ चमचे बटर
- ⅓ चमचा हळद
- चवीनुसार मीठ
- १ चमचा जिरे-मोहरी
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- थोडेसे पाणी
कृती
ही रेसिपी आपण तीन सोप्या भागांमध्ये करून घेऊया. पहिल्या भागामध्ये पनीर तळून घ्यायचे आहे, दुसऱ्या भागामध्ये मसाला वाटप तयार करायचे आहे आणि तिसऱ्या भागामध्ये सर्वकाही एकत्र करून भाजी शिजवायची आहे.
सर्वप्रथम पनीर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि इच्छित आकारात कापून घ्या. एका कढईत दोन चमचे बटर गरम करा आणि त्यात पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. पनीर जास्त तळू नका, नाहीतर ते कडक होते. तळलेले पनीर एका प्लेटवर काढून बाजूला ठेवा.


आता मसाला वाटपाची तयारी करूया. मिक्सरच्या जारमध्ये दोन टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, जिरे आणि मगजबी घाला. यामध्ये थोडेसे पाणी घालून बारीक आणि एकजीव पेस्ट करून घ्या. मगजबी घातल्याने ग्रेव्हीला छान जाडी आणि क्रीमी टेक्सचर येते, त्यामुळे ही स्टेप महत्त्वाची आहे.


आता मुख्य कढईत थोडेसे तेल किंवा बटर गरम करा. त्यात जिरे-मोहरीची फोडणी करा. जिरे फुलले की बारीक चिरलेला कांदा घाला आणि थोडासा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या. नंतर आपण तयार केलेली टोमॅटो-मगजबीची पेस्ट घाला. यात लाल तिखट, हळद, धणे पूड आणि चवीनुसार मीठ घालून मध्यम आचेवर चांगले परतून घ्या. पेस्ट तेलात छान मिसळून तेल सुटेपर्यंत भाजा. या टप्प्यावर मसाला चांगला शिजला की ग्रेव्हीला खूप छान सुगंध येतो.


Also Read,
घरच्याघरी झणझणीत खान्देशी शेव भाजी अशी बनवा – Spicy Khandeshi Shev Bhaji in Marathi
आता या ग्रेव्हीमध्ये तळलेले पनीर घाला आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्या. त्यानंतर १०० ग्रॅम बटर पनीर मसाला पेस्ट (किंवा पावडर) घाला आणि पुन्हा एकदा चांगले मिसळून घ्या. गरज वाटल्यास थोडेसे पाणी घालून ग्रेव्हीची जाडी तुमच्या आवडीप्रमाणे सेट करून घ्या. मिश्रणाला एक-दोन उकळी येऊ द्या जेणेकरून पनीर मसाला चांगला मुरेल. शेवटी गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

तुमचा चमचमीत मसालेदार बटर पनीर मसाला तयार आहे! गरमागरम भाजी तंदुरी रोटी, साध्या रोटी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा. वरून थोडेसे अतिरिक्त बटर आणि कोथिंबीर घातल्यास चव आणखी वाढते.

तुम्हाला ही बटर पनीर मसाला रेसिपी कशी वाटली, हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा!
